शाश्वत शेती अभियान (Sustainable Agriculture)

        भारत हा कृषीप्रधान देश म्हणून ओळखला जातो. पूर्वी भारतीय खेडी स्वयंपूर्ण होती. संपूर्ण अर्थव्यवस्था ही कृषी क्षेत्रावर आधारीत होती आणि आरोग्य उत्तम राहण्यासाठी आयुर्वेदाचा आधार होता. 'हरितक्रांती'ची गरज म्हणून रासायनिक खतांचा वापर वाढत गेला. रोग आणि किड नियंत्रणासाठी रासायनिक बुरशी नाशके व किडनाशकांचाही वापर वाढत गेला. या रासायनिक औषधांचे अंश पिके व फळांच्या माध्यमातून मानवी शरीरावर दुष्परिणाम करीत आहेत. रोगांची आणि रुग्णांची संख्या वाढतेच आहे. मानवी जीवनच धोक्यात आले आहे.

        आता पुन्हा एकदा नव्याने जीवन सुजलाम् सुफलाम् करण्यासाठी पुन्हा जुन्या शाश्वत शेतीचा विचार कृतीत आणावा लागेल. रासायनिक अवशेष विरहीत, सेंद्रिय शेती करावी लागेल. यामुळे पुरेशा प्रमाणात उच्चतम पौष्टिक गुणवत्ता असलेले खाद्यान निर्माण होईल. जमिनीची सुपिकता वाढून तिचा शाश्वतपणा टिकून राहील. सुक्ष्मजीव, वनस्पती व प्राण्यांचे जीवनचक्र सुरक्षित राहील. भूमी व जल या दोहोंचे संरक्षण होईल. सध्याच्या शेती पध्दतीतून निर्माण होणारे प्रदूषण थांबून मानवी जीवनमान सुधारण्यास नक्कीच मदत मिळेल.

        कोणत्याही पिकाला सगळी अन्नद्रव्ये एकाचवेळी लागत नाहीत. त्यांच्या वाढीनुसार व पिकांच्या एकूण कालावधीनुसार अन्नद्रव्यांची मात्रा कमी अधिक लागते. या गोष्टींचा अभ्यास करून किती शेतकरी खते वापरतात? पिकांच्या कालावधीसाठी लागणाऱ्या सर्व निविष्ठांच्या (म्हणजे पिकासाठी देण्यात येणारे जैव व रासायनिक घटक) वापरायचे व्यवस्थापन, वेळापत्रक किती लोकांच्याकडे आहे ? ९०% लोकांना वरील प्रश्नांची उत्तरे ठामपणे माहित नाहीत. १५ ते २० वर्षे शेती करत असूनही खतांचे डोस काढता न येणारे, नेमकी कोणती खते वापरायची ह माहित नसणारे जवळपास ७०% आहेत, हे विदारक वास्तव आहे.

        त्यामुळे शेतकऱ्यांना आपली जमिन शाबूत ठेवून, ती चांगली सुपिक करून, पुढच्या पिढीस हस्तांतरण करावयाची असल्यास आजच जागरूक व्हावे लागेल. अभ्यास करून, समजावून घेवून शेती करावी लागेल. सुपिकता वाढविण्याचे आव्हान पेलावेच लागेल अन्यथा पुढची पिढी आम्हाला माफ करणार नाही. त्यामुळेच नवीन विचारांचे, नव्या उन्नतीचे, सर्वांगीण उत्कर्षाचे 'शाश्वत शेती अभियान' (Mission Sustainable Agriculture) आम्ही घेवून आलो आहोत. शेतकऱ्यांना कर्जमुक्त' करण्यासाठी हे अभियान बळ देईल याची खात्री वाटते.